श्री श्री रविशंकर यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून ‘ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतीय आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना अमेरिकेच्या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीकडून ‘ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता दिली आहे. युनिव्हर्सिटीने शांती आणि मानवीय कार्यांसाठी आंतरधार्मिक नेता म्हणून रविशंकर यांचा सन्मान केला आहे. त्यांना गेल्या आठवड्यात याबाबतची मान्यता देण्यात आली होती.

विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यानुसार, ‘नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी सेंटर फॉर स्पिरिच्युअल्टी’, ‘डायलॉग एँड सर्व्हिस’ने रविशंकर यांना मागील आठवड्यात ‘ग्लोबल सिटीझनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता दिली आहे. युनिव्हर्सिटीचे कार्यकारी आणि आध्यात्मिक सल्लागार अलेक्झेंडर लेवेरिंग कर्न यांनी याबाबत सांगितले, की आम्ही श्री श्री रविशंकर यांचे आभारी आहोत. ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर कार्यक्रम सुरु करण्यासाठी यापेक्षा चांगली बाब नव्हती.

तसेच ते पुढे म्हणाले, श्री श्री रविशंकर यांनी अनेक स्तरांवर संवाद आणि राजकीय स्थितीच्या माध्यमातून शांतीला प्रोत्साहन दिले आहे. अनेक देशांत सुरु असलेला संघर्ष बदल्याने महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. तसेच दिलासा कार्यक्रमांचेही नेतृत्व त्यांच्याकडून केले जात आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची स्थापना
श्री श्री रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांना ‘श्री श्री’, ‘गुरुजी’ या नावांनी ओळखले जाते. त्यांनी 1981 मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेची स्थापना केली.

2016 मध्ये पद्मविभूषण
श्री श्री रविशंकर यांना 2016 मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर आता त्यांना अमेरिकेच्या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीकडून ‘ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता दिली आहे.