Coronavirus : वटवाघूळांमध्ये आढळतात शेकडो प्रकारचे ‘कोरोना’ व्हायरस, भविष्यात देखील होऊ शकतो त्यांच्याकडून ‘हल्ला’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   जगभरात साथीच्या रोगाचे रूप धारण करणाऱ्या कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात आतापर्यंत बरेच संशोधन केले गेले आहेत. आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनातून मिळवलेल्या माहितीनुसार, त्याच्या उत्पत्तीच्या मागे कुठे ना कुठे वटवाघूळच जबाबदार आहेत असे समोर आले आहे. चीनमधून केलेल्या संशोधनात हीच गोष्ट उघडकीस आली आहे, तर आता हीच गोष्ट अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ दक्षिण कॅलिफोर्नियाच्या प्रोफेसर पाउली केनन यांच्या संशोधनात समोर आली आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, कोरोना विषाणू साथीचा रोग आणि गेल्या दशकात आलेले संसर्गजन्य रोग वन्यजीवांशी संबंधित आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापक पाउली केनन म्हणाल्या, ‘आपण अशा काही परिस्थिती निर्माण केल्या आहेत ज्यामुळे काहीशा अल्पकाळातच या गोष्टी घडल्या. या काही काळाने पुन्हा घडतील.’ शास्त्रज्ञांना अद्याप याची खात्री नाही की नवीन संक्रमण कसे सुरू झाले, परंतु त्यांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणू घोड्याच्या नालच्या आकाराच्या वटवाघुळांद्वारे पसरला आहे.

केनन यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनातून पुरेसे पुरावे समोर आले आहेत की कोरोना विषाणू केवळ वटवाघुळांद्वारेच मानवांमध्ये पसरला आणि नंतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला आणि अशा रीतीने संपूर्ण जगात पसरला. त्यांच्या संशोधनात अशीच गोष्ट समोर आली आहे, जी यापूर्वीही इतर बर्‍याच संशोधनात आली आहे. केननच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारात मानवांमध्ये पसरला. महत्त्वाचे म्हणजे या बाजारात थेट वन्यजीव विकले गेले आणि ही चीनमधील सर्वात मोठी मांस बाजारपेठ आहे. तसेच असेही म्हटले आहे की असेच संक्रमण काही वर्षांपूर्वी मर्स व सार्स दरम्यानही झाले होते. यामागचे कारण देखील तेच प्राणी होते.

त्यांच्या संशोधनात असे सूचित केले गेले आहे की मर्स विषाणू वटवाघुळांपासून उंटांमध्ये पसरला आणि नंतर मानवांमध्ये त्याचा शिरकाव झाला त्याच वेळी, सार्स वटवाघुळांमधून मांजरींमध्ये पसरला आणि तेथून मानवांमध्ये आला. इबोला विषाणूदेखील वटवाघुळांपासूनच मानवामध्ये आला असावा असे संशोधन पथकाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. 1976, 2014 आणि 2016 या वर्षात आफ्रिकेतही या विषाणूमुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला होता. केनन यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनादरम्यान त्यांना कोरोना विषाणूचे असे अनेक अनुवांशिक कोड सापडले आहेत, जे वटवाघुळांमध्ये आढळतात.

तथापि, केनन याबद्दल अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत की पैंगोलिन त्यांच्याशी थेट संपर्कात आलेले असावेत अथवा त्यांच्यात हा विषाणू वटवाघुळांपासून आला असावा. त्यांच्या मते, वटवाघुळांमध्ये शेकडो प्रकारचे कोरोना विषाणू आढळतात. तसेच भविष्यात कोरोना विषाणू अधिक प्रमाणात मानवाला संक्रमित करू शकतात अशी भीती त्यांना आहे. तथापि हे 100 वर्षांतून एकदाच घडते. परंतु जेव्हा हे घडते, तेव्हा संपूर्ण जगात पसरते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.