भारताचा दबदबा वाढला ! ट्रम्प यांनी दिले संकेत, भारत विकसित देशांचा गट G-7 मध्ये होणार सामील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विकसित देशांचा गट जी-7 (G-7) च्या सदस्य देशांचा विस्तार करण्यात येण्याचे संकेत दिले आहेत. त्यात भारताच्या नावाचाही समावेश असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. या व्यासपीठाद्वारे आता विकसित देशांशी भागीदारी केली जाईल. यामुळे जागतिक स्तरावरही भारताचे वर्चस्व वाढेल. भारतासाठी हा एक मोठा विजय आहे. तथापि, अध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या आजारामुळे जी-7 ची बैठक तहकूब केली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, गट वाढविणे ही काळाची गरज आहे. तसेच ते म्हणाले की जी -7 चे स्वरूप खूप जुने आहे. हे संपूर्ण जगाचे योग्यप्रकारे प्रतिनिधित्व करीत नाही. म्हणून त्याचा विस्तार आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जी-7 ची भूमिका आणि आव्हाने काय आहेत आणि यात भारताचा समावेश झाल्याने आशियाचे समीकरण कसे बदलेल हे जाऊन घेऊया…

ट्रम्पच्या विस्तार योजनेत चीनचा समावेश नाही      

जी -7 ही सात सदस्य देशांची संघटना आहे. सध्या त्याचे सदस्य देश अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन हे आहेत. शनिवारी अध्यक्ष ट्रम्प यांनी याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या विस्तारामध्ये आशियामधील भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांचा समावेश करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांना देखील या संघटनेचा सदस्य बनवण्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयावर चीन आणि पाकिस्तान नाराज होऊ शकतात. अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोना साथीच्या आजारात डब्ल्यूएचओच्या भूमिकेच्या तपासणीबाबत भारत आणि ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला उघडपणे समर्थन केले आहे.

काय आहे जी -7

जी -7 हा जगातील सात मोठ्या मानल्या गेलेल्या विकसित आणि प्रगत अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा गट आहे. यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. याला ग्रुप ऑफ 7 देखील म्हणतात. हा गट लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवतो. स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण, लोकशाही आणि कायद्याचे राज्य आणि समृद्धी आणि शाश्वत विकास ही या गटाची मुख्य तत्त्वे आहेत. सुरुवातीला हा सहा सदस्य देशांचा गट होता. त्याची पहिली बैठक 1975 साली झाली. 1976 मध्ये कॅनडा देखील या गटाचा सदस्य झाला. अशाप्रकारे ते जी -7 बनले. जी-7 देशांचे मंत्री आणि नोकरशहा दरवर्षी परस्पर हितसंबंधांच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी भेट घेतात. इतर देशांच्या प्रतिनिधींना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनाही या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.