WHO पासून अमेरिकेची ‘फारकत’, ट्रम्प सरकारनं पाठवलं अधिकृत ‘लेटर’

नवी दिल्ली : अमेरिका आता जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य राहिला नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकारने डब्ल्यूएचओला यासंदर्भातील आपला निर्णय पाठवला आहे. डब्ल्यूएचओ आणि अन्य देशांसाठी हा एक मोठा धक्का असू शकतो. ट्रम्प सरकारने कोरोना व्हायरस प्रकरणात आरोप केला आहे की, डब्ल्यूएचओ चीनच्या दबावाखाली करत आहे. सोबतच एप्रिल महिन्यापासून अमरिकन सरकारने डब्ल्यूएचओला निधी देणे बंद केले होते.

अमेरिकन मीडियानुसार, ट्रम्प सरकारने डब्ल्यूएचओमधून आपले सदस्यत्व मागे घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. 6 जुलै 2021 नंतर अमेरिका डब्ल्यूएचओचा सदस्य असणार नाही. 1984 मध्ये ठरलेल्या नियमांनुसार कोणत्याही देशाने सदस्यत्व परत घेतल्यानंतर एक वर्षानंतरच त्या देशाला डब्ल्यूएचओमधून बाहेर पडता येते. याशिवाय अमेरिकेला डब्ल्यूएचओची सर्व देणी चुकती करावी लागतील.

अमेरिकन सिनेटर रॉबर्ट मेनेन्डेज यांनी ट्विट करत या वृत्ताला दुजोरा दिला की, अमेरिकेद्वारे डब्ल्यूएचओमधून बाहेर पडण्यासंबंधी सूचना प्राप्त झाली आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाने अमेरिका आजारी आणि एकटी पडेल.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. तसेच डब्ल्यूएचओला देण्यात येणारा निधी तात्काळ रोखण्यात आला होता. अमेरिकेचा आरोप आहे की, चीनमध्ये कोरोना व्हायरसची ओळख आणि त्यास महामारी घोषित करण्यास डब्ल्यूएचओने जाणीवपूर्वक उशीर केला. सोबतच आता डब्ल्यूएचओ आता चीनी सरकारच्या इशार्‍यावर काम करत आहे.