PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचा डेटा डार्कवेबवर लिक, सायबर सेक्युरीटी फर्मचा दावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाईट सप्टेंबर महिन्यात हॅक झाली होती. त्यानंतर त्या वेबसाईटद्वारे ट्विट करत फॉलोअर्सना क्रिप्टोकरन्सीद्वारे पीएम नॅशनल रिलीफ फंडात दान करण्याचे आवाहन करण्यात आले. काही वेळानंतर अकाऊंट रिस्टोअर झाले होते. मात्र आता अमेरिकन सायबर सेक्युरीटी फर्म सायबरने या हॅकिंगबाबत दावा केला आहे. हे हॅकिंग वेबसाईटच्या कॉनफिगरेशनद्वारे झाले होते, असे फर्मने म्हटले आहे. कंपनीने डार्क वेबसाईटवर वेबसाईटचा डेटाबेस आढळल्याचे म्हटले आहे. कंपनीने आपल्या आहवालात डार्कवेबवर असलेल्या डेटाबाबत बराच तपशील दिला आहे.
कोणता डेटा लिक झाला ?
सायबलच्या म्हणण्यानुसार, वेबसाईट यूजर्सबाबत अनेक प्रकारची खासगी माहिती लिक झाली आहे. आणि ती सर्व डार्क वेबसाईटवर उपलब्ध आहे. cctransactions आणि users चे डेटाबेस देखील लिक झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तब्बल 5 लाख 70 हजारापेक्षा अधिक यूजर्सची खासगी माहिती लिक झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे. यामध्ये त्यांची नावे, ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट डीटेल्सचा समावेश आहे. याचा उपयोग गुन्हेगारी स्वरुपासाठी केला जाऊ शकतो, अशी शंका कंपनीने व्यक्त केली आहे. या सर्व डेटाचा उपयोग फिशिंग ईमेल, स्पॅम टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे सायबलने म्हटले आहे.
देणगीदारांचा डेटा लिक
डार्क वेबवर देणग्यांबाबतचा तपशील असलेला डेटाबेस देखील लिक झालेला आहे. वेबसाईटच्या एकूण 5 लाख 70 हजार यूजर्सपैकी 2 लाख 92 हजाराहून अधिक यूजर्सनी देणग्या दिलेल्या आहेत. यात कोविड -19 व्यतिरिक्त स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ सारख्या अभियानांसाठीही देण्यात आलेल्या दानाचा देखील समावेश आहे. त्या यूजर्सनी कोणत्या मोडद्वारे, कोणत्या बँकेद्वारे पेमेंट केले, याचा तपशील देखील उपलब्ध आहे.
डेटा लिक झाल्यावर काय करावे ?
कोणकोणत्या यूजर्सचा डेटा लिक झाला आहे, याबाबत अमेरिकन कंपनीने एका वेबसाईटवर माहिती दिली आहे. यूजर्सचा डेटा लिक झाला किंवा नाही याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर मिळू शकते. जर डेटा लिक झाला असेल तर तो कुठे-कुठे झाला आहे. याबाबतची माहिती देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे.