डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍याची उचलबांगडी, बाजी पलटण्याची तयारी

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. यातच आता माध्यमांमध्येही बाजी पलटण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉनमधील सर्वांत वरिष्ठ अधिकाऱ्याची उचलबांगडी केली आहे. त्यामुळे बाजी पलटणार अशीच चर्चा जोर धरू लागली असून संरक्षण मंत्रालयातील बदलांमुळे लोकांची चिंता वाढवली आहे.

दरम्यान, अगदी शांततामयरित्या सत्तेचे हस्तांतर होईल. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष होतील,असे संरक्षणमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे संक्रमण काळात ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात एक धोकादायक अस्थिर वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोप सीनेटमधील परराष्ट्र संबंधातील समितीचे डेमोक्रॅट क्रिस मर्फी यांनी केला आहे.
अमेरिकन माध्यमांमध्ये ट्रम्प आकस्मिकरित्या बाजी पलटण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नाही, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकन संरक्षण मंत्रालयातही मोठ्या प्रमाणावर बदल केले जात असल्याचे वृत्त आहे.

ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी संरक्षण सचिव मार्क अ‍ॅस्पर यांना पदावरून काढले होते. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मार्क अ‍ॅस्पर यांना बरखास्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय संरक्षण दहशतवाद केंद्राचे संचालक ख्रिस्तोफर सी. मिलर यांना कार्यवाहक संरक्षण सचिव म्हणून नियुक्त करत आहे. अ‍ॅस्पर यांची बरखास्ती जाे बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथेपर्यंत अराजक निर्माण करेल.

दरम्यान, निवडणुकीच्या केवळ एक आठवडा आधीच अ‍ॅस्पर यांनी भारताचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी माइक पॉम्पिओ यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह २ प्लस २ मंत्रिस्तरावरील चर्चेत भाग घेतला होता.