Coronavirus : ‘कोरोना’नं बदललं रुप ! पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक आणि आक्रमक, अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिला इशारा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूबद्दल नवीन आणि खळबळजनक माहिती दिली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांना पूर्वीपेक्षा नवीन प्रकारचा आणि धोकादयक कोरोनाचा विषाणूचा शोध लागला आहे. हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे आणि तो जगभरात पसरत आहे. वैज्ञानिकांच्या मते 2019 मध्ये साथीच्या सुरुवातीस सापडलेल्या कोरोना विषाणूचा धोका हा त्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे.

अमेरिकेतील लॉस अ‍ॅलामोस नॅशनल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या उर्जा विभागाची राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. दुसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रे तयार करण्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना केली गेली.

शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनाबद्दल 33 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या अहवालाचा आढावा घेण्यात आलेला नाही. लॉस एंजेलिस टाईम्सच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी महिन्यात नवीन कोरोना विषाणू युरोपमध्ये सापडला आहे. यानंतर तो अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी भागात पोहचला. यानंतर मार्चच्या मध्यांन हा जगभर पसरला. अहवालात असे सांगितले आहे की, हा विषाणू वेगाने पसरतो आणि एकदा संसर्ग झाल्यावर तो रुग्णावर दुसऱ्यांदा अधिक वेगाने आणि धोकादायक मार्गाने हल्ला करतो.

अहवाल लिहणाऱ्या लेखकांनी सांगितले की, या प्राणघातक कोरोना विषाणूबाबत शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच चेतावणी दिली आहे. जेणेकरून लसीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी यावर लक्ष द्यावे आणि त्यानी पूर्व तयारी करावी. संगणक गणितांच्या सहाय्याने नवीन अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये जगभरातून कोरोना विषाणूच्या 6 हजार विविध प्रकराचा अभ्यास केला गेला आहे. शास्त्रज्ञांना या विषाणूचे 14 विविध म्यूटेशन दिसले आहेत.

हा अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने अशी माहिती दिली आहे की, नव्या प्रकारच्या व्हायरसविषयीची माहिती अतिशय भयानक आहे. आम्ही विषाणूमध्ये त्वरीत म्यूटेशन पाहिले. व्हायरस वेगाने रुप बदलत आहे आणि मार्च पर्यंत मुख्यत्वे साथीच्या रोगात सामील झाला. शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की अशा प्रकारचे व्हायरस अधिक वेगाने पसरतात.