ह्यूस्टनमध्ये भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. संदीप धालीवाल असे हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून 10 वर्षांपूर्वी त्यांनी पोलिसात प्रवेश केला होता. काल त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांची नेमणूक ट्रॅफिक स्टॉपवर होती. यावेळी पेट्रोलिंग करत असताना ते आपल्या गाडीकडे चालले असताना गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

या प्रकरणी अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रिया आल्या असून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट करत आपल्या संवेदना प्रकट केल्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, हत्या झाल्याचे ऐकून फार दुःख झाले. आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना प्रकट केल्या. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले कि, हत्या झाल्याचे ऐकून फार दुःख झाले. आम्ही नुकतेच त्या शहरातून परत आलो आहोत. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्यार देखील जप्त केले आहे. या हत्याराचा वापर हत्येमध्ये झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यामागील कारणाचा देखील शोध घेतला जात आहे.