उत्तर कोरियाचे ‘तानाशाह’ किम जोंग उन अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत ?

प्योंगयांग :  वृत्तसंस्था –   उत्तर कोरिया या वर्षाच्या अखेरपर्यंत दूरवर मारा करणाऱ्या आपल्या नव्या मिसाइल लॉन्चपॅडची निर्मिती पूर्ण करणार आहे. अमेरिकेच्या एका थिंकटँकच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या प्योंगयांग एअरपोर्टजवळ लॉन्चपॅडसाठीच्या जागेवर काम सुरु आहे. सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून अमेरिकेला ही माहिती मिळाली आहे.

अमेरिकेला मिळालेल्या छायाचित्रांमध्ये प्योंगयांगमध्ये एक भव्य मिसाइल लॉन्चपॅड दिसत आहे आणि या लॉन्चपॅडमधून उत्तर कोरिया बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रम हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर स्ट्रेटीजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजनुसार (CSIS) प्योंगयांगजवळ एका अंडरग्राऊंड तळानजिकच लॉन्चपॅडची जागा तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणी उत्तर कोरिया आपल्या सर्वाधिक क्षमतेच्या अमेरिकेपर्यंत मारा करु शकतील अशा मिसाइलची निर्मिती करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सीएसआयएसच्या म्हणण्यानुसार प्योंगयांग एअरपोर्टवर हे काम 2016 पासून सुरु झालेलं आहे. जवळच एक रेल्वे टर्मिनल देखील तयार करण्यात आले असून दोन मोठ्या इमारतींचंही बांधकाम करण्यात आलं आहे. इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिकसारख्या आणखी काही तगड्या क्षमतेच्या मिसाइल ठेवण्याची या उंच इमारतींची क्षमता आहे, असंही सीएसआयएसने आपल्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय या दोन इमारतींना जोडणाऱ्या रस्त्यांची रुंदी इतकी मोठी ठेवण्यात आली आहे की ज्यावरून मोठ ट्रक आणि मिसाइल लॉन्चरची वाहतूक सहजपणे या ठिकाणाहून होऊ शकेल.