अमेरिकन युनिव्हर्सिटीतील डॉक्टरकडून 500 पेक्षा अधिक महिलांचे ‘लैंगिक’ शोषण

पोलीसनामा ऑनलाईनः अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये तब्बल 500 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांच्यावर हा लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत आता युनिव्हर्सिटी पीडित महिलांना 1.1 अरब डॉलर म्हणजेच 8 हजार कोटी रुपये देणार आहे. 3 विविध प्रकरणांसाठी कोर्टाने ही भरपाई घोषित केली आहे.

युनिव्हर्सिटीने हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत डॉ. जॉर्ज टिंडल यांच्याविरुद्धच्या कारवाईला प्रोत्साहन दिले आहे. युनिव्हर्सिटीतील बोर्ड ऑफ ट्रस्ट्रीजचे अध्यक्ष रिक कारूसो यांनी सांगितले की, युनिव्हर्सिटी अशा गोष्टींची काळजी घेऊ शकली नाही, ज्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. या प्रकरणामुळे प्रतिमेला खूप नुकसान पोहचले आहे. 2018 नंतर 500 महिलांनी युनिव्हर्सिटीविरुद्ध तक्रार दाखल केली असून सध्या ही युनिव्हर्सिटी तक्रारीचे केंद्र बनले आहे. 2016 मध्ये अशा प्रकारची पहिली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तपासाला सुरूवात केली असता, आतापर्यंत अनेक प्रकरणं समोर आले आहेत. ज्यात स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांनी लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.