परदेशात ‘भारतीय’ वैज्ञानिकांचं सर्वाधिक ‘योगदान’, स्टॅनफोर्ड विद्यापीठानं जाहीर केली यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परदेशात भारतीयांचा दबदबा नेहमीच असतो, मग ते डॉक्टर असोत, इंजिनिअर असोत की मग संशोधक. जगभरात भारतीयांनी त्यांच्या कौशल्याच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. अशातच अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शास्त्रज्ञांची एक यादी प्रसिद्ध केली, ज्यात भारताच्या दोन आयआयटीमधील वैज्ञानिकांची संख्या सर्वाधिक आहे.

या यादीमध्ये आयआयटी गुवाहाटीच्या 22 अध्यापक वर्गातील सदस्यांसह संशोधकांना स्थान मिळाले आहे. याशिवाय आयआयटी बीएचयू (वाराणसी) च्या 14 सदस्यांचा देखील या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर आयआयटी गुवाहाटीने दिलेल्या निवेदनानुसार स्टॅनफोर्ड विद्यापीठात तज्ज्ञांनी एक लाखाहून अधिक अशा वैज्ञानिकांच्या नावांची यादी तयार केली आहे. ज्यांच्या संशोधन कार्यामुळे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील प्रगतीमध्ये हातभार लागला आहे आणि संशोधकांना देखील यातून फायदा झाला आहे.

या यादीमध्ये आयआयटी गुवाहाटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, भौतिकशास्त्र, रसायन इंजिनिअरिंग, बायो-विज्ञान आणि बायो-इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाशी संबंधित सदस्यांची नावे या यादीत समाविष्ट केली गेली आहेत.

अधिक माहिती म्हणजे अमेरिकन युनिव्हर्सिटीने आपल्या यादीमध्ये जगभरातील सुमारे 1,59,683 नावे समाविष्ट केली आहेत. त्यापैकी 1500 भारतीय आहेत. यामध्ये इंजिनिअर, वैज्ञानिक आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांची निवड त्यांच्या शोधनिबंधांच्या आधारे केली गेली आहे.