Coronavirus In World : चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर अमेरिकी ‘लस’, रिसर्च चोरल्याचा देखील आरोप

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – चीन-अमेरिकेनी परस्परांच्या सैन्यांचं तंत्रज्ञान, गुप्त कागदपत्रं यांची चोरी केल्याचे आरोप या आधी पण अनेकदा केले गेले आहेत. पण अमेरिकेनी आता चीनवर कोविड-19 बाबत केलेल्या संशोधनाची चोरी केल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकी गुप्तचर आणि गृह (होमलँड) मंत्रालय यासंबंधी धोक्याची सूचना देण्याच्या तयारीत आहे. चीनमधील सर्वांत कौशल्यवान हॅकर्सनी अमेरिकेचे संशोधन चोरण्यासाठी अमेरिकेवर सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढवले आहे असा दावा अमेरिकेनी केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संघटना (FBI) आणि होमलँड सुरक्षा मंत्रालयांनी याबाबत मोठी कारवाई करायची तयारी सुरू केली आहे.

त्यानुसार अमेरिकेतील प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधन केंद्रांपासून विद्यापीठं, संशोधन विभाग आणि हॉस्पिलमधील जे जे लोक कोरोनासारख्या घातक विषाणूवरील उपचार शोधत आहेत त्यांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.