अमेरिकेचा भारताला मोठा ‘झटका’ ; भारताची विशेष व्यापारी सूट काढली, ५ जूनपासून होणार ‘हे’ नुकसान

वॉश्गिंटन : वृत्तसंस्था – भारतात नवनिर्वाचित सरकार स्थापन होताच अमेरिकने भारताला मोठा झटका दिला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा विशेष व्यापारी सूट देणारा दर्जा (GSP) काढून घेतला आहे. अमेरिकेने भारताला GSP चा दर्जा काढून काढून घेण्याबद्दल ६० दिवसांची नोटीस दिली होती. या नोटिसीची मुदत ३ जूनला संपत असून ५ जूनपासून भारताचा विशेष दर्जा काढून घेण्यात येईल. काही दिवसापूर्वी अमेरिकेने तुर्कीची व्यापार संधी (GSP) बंद केली आहे.

GSP कार्यक्रम थांबविल्यास भारतात निर्यात व्यापार वाढवू पाहणा-या कंपन्यांना फटका बसू शकतो, असा इशारा देत अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी याला विरोध दर्शवला होता मात्र अमेरिकी काँग्रेस सदस्यांची हे अपील रद्द करण्यात आले आहे. याविषयी घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की , ‘भारताबरोबरची ही योजना आम्ही पुढे सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले नव्हते. त्यामुळे भारत आता या योजनेचा लाभार्थी नसेल. अमेरिकी वस्तूंना भारतात समान संधी देण्याचे वचन भारताने दिलेले नाही, त्यामुळे भारताचा GSP लाभ काढून घेण्यात येत आहे . ‘

भारताचे होणार नुकसान –

जीएसपी अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा मिळणार नाही. अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. २०१७ मध्ये भारताने ५. ७ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.

GSP म्हणजे काय –

जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रीफेन्स (GSP) हा अमेरिकेचा मोठा आणि जुना सामान्यीकृत व्यापार प्राधान्य कार्यक्रम आहे. निवडक लाभार्थी देशांच्या हजारो उत्पादनांना विनाशुल्क प्रवेश देत आर्थिक विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती.