चीनला उत्तर देण्याची तयारी, ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणारा स्पेशल फोर्स लडाखमध्ये ‘तैनात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसोबत तणाव सुरू असतानाच भारताने लडाखमध्ये स्पेशल फोर्सेस तैनात केल्या आहेत. सूत्रांच्या महितीनुसार, देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून पॅरा स्पेशल फोर्सच्या युनिटला लडाखमध्ये नेण्यात आले आहे, जेथे ते युद्धसराव करत आहेत. स्पेशल फोर्सेसने 2017 मध्ये पाकिस्तानविरूद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. सूत्रांनी सांगितले की, जर आवश्यकता भासली तर त्यांचा वापर चीनविरूद्ध सुद्धा केला जाऊ शकतो.

स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांची भूमिका सांगण्यात आली आहे, जी चीनसोबत शत्रूत्व वाढल्यानंतर बजावण्याची गरज पडू शकते. भारतात 12 पेक्षा जास्त स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत, ज्या वेगवेगळ्या भागात प्रशिक्षण घेतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या लेहमध्ये आणि त्याच्या जवळपासच्या उंच क्षेत्रात नियमित युद्धसराव करतात.

भारत आणि चीनमध्ये मेच्या सुरूवातीपासून तणाव कायम आहे. हा तणाव 15 जूनला गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर आणखी वाढला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनने आपले सैनिक मारले गेल्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

दोन्ही देश चर्चेद्वारे एलएसीवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीनच्या सैन्य अधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या फेर्‍यासुद्धा झाल्या आहेत. चीन एकीकडे चर्चेचा दिखावा करत आहे, आणि दुसरीकडे संशयास्पद हालचालीही करत आहे.

तर, भारताने आपल्या शहीद झालेल्या 20 सैनिकांचा बदला घेण्यास सुरूवात केली आहे. सरकार चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे. मोदी सरकारने चीनचे 59 अ‍ॅप्स बॅन केले आहेत. याशिवाय चीनच्या कंपन्यांशी असलेले काही करार रद्द केले जात आहेत.

चीनसोबत तणाव असताना मोदी सरकार अनेक मोठे निर्णय घेत आहे. गुरुवारीच संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत 21 मिग-29 आणि 12 सुखोई (एसयू-30 एमकेआय) लढाऊ विमाने खरेदी प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यासोबतच 59 मिग-29 लढाऊ विमानांच्या अपग्रेडेशनला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. मिग-29 लढाऊ विमानांची रशियाकडून खरेदी केली जाणार आहे. सोबतच सध्याच्या मिग-21 लढाऊ विमानांचे अपग्रेडेशन सुद्धा करण्यात येणार आहे.