जेटच्या कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर… काहींनी गाड्या विकल्या तर काहींकडून सोने गहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किंगफिशरनंतर बंद पडलेल्या जेट एअरवेज ने बुधावारी रात्री साडेदहा वाजता शेवटच्या विमानाचे उड्डाण केले. त्यानंतर जेटने आपली सेवा रद्द केली. त्यामुळं आता अनिश्चित काळासाठी जेटची विमानं जमिनीवरच राहणार आहेत. याचा मोठा फटका मात्र जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. जवळपास २०,००० कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना गेल्या ३-४ महिन्यांपासून वेतन मिळले नाही. त्यामुळे गुरुवारी दिल्लीत एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

काहींनी गाड्या विकल्या तर काहींनी सोने गहाण ठेवले
अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिल्ली येथे एकत्र येऊन पंतप्रधान यांच्याकडे शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करीत मदत मागितली. यावेळी एकत्र आलेल्या कर्मचारयांनी सरकार आणि बँकांना यासाठी जबाबदार धरले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यापैकी काहींच्या मुलांचे शाळेचे पैसे भरायचे आहेत तर काहींचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. काहींनी आपली वाहने विकली आहेत तर काहींनी सोने गहाण ठेवले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी देश-विदेशात जाणार्‍या हजारो पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केलेल्या तिकिटांचे करोडो रुपये अडकल्याने पर्यटकही गोंधळून गेले आहेत.

जेट एअरवेजला ४ हजार २४४ कोटींचे नुकसान
कर्जात बुडालेल्या जेट एयरवेजनं बँकांकडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. परिणामी कंपनी बंद करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. गेल्या आर्थिक वर्षात जेट एअरवेजला ४ हजार २४४ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीने जानेवरीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचार्‍यांना वेतन दिलेले नाही. या व्यतिरिक्त इतर कर्मचार्‍यांना अंशत: वेतन दिले जात होते. मात्र त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कधीकाळी देशातील अव्वल विमान कंपनी म्हणून जेट एअरवेजचे नाव होते. कंपनीने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणंदेखील रद्द केली आहेत.