रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणाला गंडा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वेत अधिकारी असल्याचे सांगत रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने तरुणाला १ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

नागनाथ मनोहर इंगळे व लक्ष्मण करोसिया (बोपखेल) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित शिवाजी पाटेकर (२६, बालाजीनगर धनकवडी) या तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित पाटेकर याचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. तो काही कामानिमित्त २०१७ मध्ये खडकी कॅन्टोनमेन्टच्या रुग्णालयात भेट झाली. त्यावेळी इंगळे व करोसिया यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी आपण रेल्वेत नोकरीला असल्याचे सांगत रेल्वेतील कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. तसेच त्याला माझ्या खुप ओळखी आहेत. असे म्हणत नोकरी लावण्याचे अमिष दाखवले.

त्यासाठी तरुणाकडून वेळोवेळी १ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला नोकरी लागल्याचे सांगत बनावट अपॉईंटमेंट लेटर दिले. तरुणाने ते लेटर पाहिल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक हरिष ठाकूर करत आहेत.