दिव्यांग मुलाच्या कुटुंबीयांसाठी बागुल यांनी दिला मदतीचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका दिव्यांग मुलाला फिट्सचा त्रास होतो तो टाळण्यासाठी औषधांची गरज होती. लॉकडाऊनमुळे त्याचे वृध्द आई वडिल असहाय्य होते. अशा प्रसंगी अमित आबा बागुल मदतीला धावून गेले. खूप धडपड करून ती औषधे त्यांनी मिळवून दिली, एवढयावरच न थांबता त्या कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढा शिधाही दिला. मुलाच्या आई, वडीलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले.
तळजाई वसाहतीत राहाणाऱ्या दासू मनोहर घुगे या मुलाची अवस्था पाहता करुणा दाटून येते.  दासू सतरा अठरा वर्षांचा आहे. त्याला जन्मत:च आलेले अंधत्व, लहान मेंदू विकसित न झाल्याने आलेले अपंगत्व. ७८ वर्षाचे पायाने अधू असलेले त्याचे वडील  आणि हृदयाच्या विकाराने आजारी असलेली ६५ वर्षांची आई असे तिघांचे कुटुंब. फिट येऊ नये याकरिता दासूला दररोज तीन वेळा औषधी गोळ्या घ्याव्या लागतात. एक गोळी जरी चुकली तर फिट येते, जीव घाबरा होऊन जातो. दरवेळी ही औषधे आणणे त्यांना कसेबसे जमते कारण, वडील हातगाडीवर केळी विकतात, आई घरात किरकोळ कामे करते. दोघांचे मिळून  दिवसाकाठी उत्पन्न दीडशे रुपये. लॉकडाऊनच्या काळात ते उत्पन्नही बुडाले. घरात धान्य आणि त्याहीपेक्षा या मुलासाठीची अत्यावश्यक औषधे आणायची कशी ? या काळजीत ते कुटुंब होते. ही माहिती अमित बागुल यांना कळली. त्यांनी घुगे यांच्या घरी जाऊन औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेतले आणि महिनाभर पुरतील एवढी त्याची आणि त्याच्या आईची औषधे आणून दिली. औषधांची मदत वेळीच मिळाल्याने त्या कुटुंबाला आधार वाटला. दरम्यान, डॉ. अभिजीत मोरे, प्रशांत कनोजिया, घुगे यांचे शेजारी सुभाष जांभुळकर  यांनीही या कुटुंबाला मदत केली.
लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला तशी या कुटुंबाला परत मदतीची गरज निर्माण झाली. पुन्हा एकदा अमित बागुल त्यांच्या मदतीसाठी उभे राहिले. बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घुगे यांच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यांनी या कुटुंबाला महिनाभर पुरतील एवढी औषधे आणि धान्य दोन दिवसांपूर्वी नेऊन दिले. तसेच अजून काही हवे असल्यास मला सांगा असेही बागुल यांनी घुगे यांना सांगितले.
अनेक ठिकाणी मी मदतकार्य केले. पण घुगे कुटुंबाची समस्या पाहून मला धक्का बसला. आपल्या आसपास असे एखादे कुटुंब असेल तर तरुणांनी त्यांची जबाबदारी आबा बागुल यांच्याप्रमाणे ‘श्रावण बाळ’ बनून घ्यावी असे अमित बागुल यांनी सांगितले.