दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचे ममतांवर टीकास्त्र 

मालदा (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. दरम्यान आज पश्चिम बंगाल मधील मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जन आणि सरस्वती पूजनासाठी परवानगी मिळत नाही. आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काय पाकिस्तानमध्ये करायचे का? असा सवाल अमित शहांनी केला.

यावेळी बोलताना अमित सहा यांनी रथयात्रा, रोहिंग्यांच्या प्रश्न, नागरिकत्व संशोधन विधेयक, दुर्गापूजा विसर्जन यासह अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच शनिवारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या महारॅलीवरही टीका केली.

ही तर सेल्फी महाआघाडी
दरम्यान, भाजपला सत्तेवरून हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सह इतर पक्ष एकवटले आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकत्यात महाआघाडी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या महाआघाडी रॅलीबाबत बोलताना, अमित शहा यांनी ‘ही विरोधी पक्षांनी केलेली महाआघाडी ही सेल्फी महाआघाडी’ असल्याचा टोला यावेळी बोलताना लगावला.

दरम्यान अमित शहा यांना काही दिवसांनपूर्वी आजारपणामुळे एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा बंगालमधील मालदा येथे आयोजित करण्यात आली होती.