अमित शहांनी गृह मंत्रालयात कामाचा ‘रेटा’ लावल्याने ‘नॉर्थ ब्लॉक’सह IPS अधिकारी ‘अवाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता भाजपने कामाला वेगाने सुरुवात केली आहे. दुसऱ्या कार्यकाळात भाजपने सर्व मंत्र्यांना कडक आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना कार्यालयातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत अक्षरशः देश पिंजून काढणारे अमित शहा देखील हाच आदेश पाळून केंद्रीय गृहमंत्रालयात सकाळी दहापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आपल्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात काम करत असतात. दुपारचे जेवण देखील ते कार्यालयातच करतात.

यामुळे कर्मचाऱ्यांना देखील आता काम करताना अजिबात वेळकाढूपणा करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अमित शहा जोपर्यंत कार्यालयात आहेत, तोपर्यंत दोन्ही राज्यमंत्र्यांना देखील कार्यालयातून बाहेर जात येत नाही.

केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह या खात्याचे मंत्री असताना इतका वेळ कार्यालयात बसत नसत. ते दुपारच्या जेवणासाठी घरी जात असत. त्यानंतर ते दुपारून घरूनच कामकाज पाहत असत. त्याचप्रमाणे त्यांच्या बैठक देखील ते घरीच घेत असत. अनेक वर्षात असा काम करणारा गृहमंत्री पहिला नसल्याचे अनेक पत्रकार खासगीत सांगतात. अमित शहा हे कडक शिस्त आणि नियमितपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे भाजप नेत्यांसाठी त्यांची हि कामाची पद्धत नवीन नाही.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत १९ विभाग येतात. अमित शहा स्वतः प्रत्येक विभागावर जातीने लक्ष ठेवत असल्याची माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दस्तुरखुद्द गृहमंत्रीच मंत्रालयात कामाचा रेटा लावत असल्यामुळे उच्चपदस्थ अधिकारी तसेच काही IPS अधिकारी आणि संपूर्ण ‘नॉर्थ ब्लॉक’ अवाक झाला आहे. वरिष्ठ IPS अधिकार्‍यांना वेगवेगळया कामांसाठी गृहमंत्रालयात जावे लागते. पुर्वीपेक्षा अधिक जलद गतीने गृहमंत्रालयाचे कामकाज चालत असल्याची चर्चा सध्या दिल्‍लीच्या वर्तुळात आहे.