अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील, शशी थरुरांचा ‘पलटवार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अमित शहांना टोला लगावला असून अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील असे थरूर म्हणाले. अमित शहा कोणत्याही गोष्टीचं खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचं काम करीत असतात, अशी टीका देखील त्यांनी केली.

शशी थरुर हे एका पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनी कधीही असा विचार केला नाही की धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होईल. तसेच ते पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाने कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही आणि १९३५ मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली तर १९४० मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली होती. तसेच देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचं देखील खूप महत्व आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी भाजप आणि काँग्रेस यांच्या विचारसरणी बाबत देखील मतं स्पष्ट केले आणि म्हटले की, भाजपा असा एकमेव पक्ष आहे ज्याचं राजकारण हिंदुत्व, हिंदू यावर सुरु आहे. तर काँग्रेसने देशातील प्रत्येक जाती-धर्माला सोबत घेण्याचं राजकारण केलं आहे. तसेच प्रादेशिक पक्षाचे महत्व स्पष्ट करत ते म्हटले की देशात एकूण ५३ प्रादेशिक पक्ष आहेत. सध्या लोकसभेत १४५ खासदार हे प्रादेशिक पक्षाचे निवडून आले आहेत. काही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपाने प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत सत्ता स्थापन केली आहे. तसेच राज्याच्या विकासात प्रादेशिक पक्षांची भूमिका ही निर्णायक असते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com