‘या’ कारणाने अमित शहांनी अर्धवट सोडला महाराष्ट्र दौरा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाच राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून भाजपाने कंबर कसली आहे. भाजपासाठी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणे खूप महत्वाचे आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडून अमित शहा यांना ताबडतोब दिल्लीला रवाना व्हावे लागले. अमित शहा तडकाफडकी दिल्ली ला का निघाले यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान  राज्यसभेत तिहेरी तलाकच्या मुद्यावर भाजपनं व्हीप बजावला आहे. भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह हे राज्यसभेचे खासदारही आहेत. याशिवायच ११ आणि १२ जानेवारीला दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद आहे. त्याच्या काही बैठका असल्यानं देखील शाह हे तातडीनं महाराष्ट्रातून दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
अमित शहा हे नांदेड इथल्या गुरुद्वाराला भेट देणार होते. परंतु सकाळी ते अचानक दिल्लीला निघून गेले. त्यानंतर शहा महाराष्ट्र दौरा अर्ध्यावरच सोडून का गेले, याविषयी मोठी चर्चाही रंगली. पण भाजपने राज्यसभेत तिहेरी तलाकवर व्हीप बजावला असल्याने अमित शहा दिल्लीला परतले, अशी माहिती आहे.
अमित शहांच्या ‘पटक’ देंगे इशाऱ्यावरून राजकीय घमासान 
रविवारी लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आक्रमक भाषण करत मित्रपक्ष शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको ‘पटक’ देंगे असा इशारा त्यांनी दिलाय. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचीही फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. “महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवावी.” असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
आम्हाला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाही : संजय राऊत 
‘भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मित्रपक्षांना ‘पटकावण्याची’ भाषा गर्दीसमोर केली. आम्हीसुद्धा गोरेगावमध्ये ‘एकला चलो रे’चा आवाज दिला आहे. आम्ही नाही नाही म्हणत असताना आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत आमच्या मागे ‘रोडरोमियो’सारखे का लागता? असं मागे लागणं हे कायद्याने गुन्हा आहे. आम्हाला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाही. अशाने तुमचंच हसं होईल. प्रेमवीरांसारखं फ्रस्ट्रेशन निघेल. प्रेमवीर कसा वेडा होतो किंवा आत्महत्या करतो’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला. पुन्हा एकदा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला.