Corona : लॉकडाऊनवर केंद्र सरकारने केले हात वर, राज्यांवर ढकलली जबाबदारी; अमित शाह म्हणाले – ‘आता राज्यांकडे अधिकार’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसमुळे स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे, अनेक राज्यांनी आपल्या येथे याच कारणामुळे मिनी लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू सारखे प्रतिबंध लावले आहेत. परंतु स्थिती अशी आहे की, त्यावर आता पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊनचे संकट दिसू लागले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेबाबत सांगितले की, केंद्राने प्रतिबंधाबाबत निर्णय घेण्याची सूट आता राज्यांना दिली आहे, राज्य सरकारे आपल्या हिशेबाने निर्णय घेऊ शकतात.

एका मुलाखतीत अमित शाह यांनी म्हटले की, मागील 3 महिन्यांपासून आम्ही प्रतिबंध लावण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत, कारण प्रत्येक राज्याची स्थिती एकसारखी नाही. अशावेळी राज्य सरकारांना आपल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.

अमित शाह म्हणाले, जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हा देशात हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर खुप कमजोर होते, बेड्स-टेस्टिंग-ऑक्सीजनसह अनेक प्रकारच्या सुविधा नव्हत्या. मात्र, आता केंद्राने मदत केल्याने राज्यांकडे या सर्व सुविधा मोठ्याप्रमाणात असून तयारी झाली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक राज्याला आपल्या येथील स्थितीनुसार स्वता निर्णय घ्यावे लागतील आणि केंद्र सरकार त्यांना पूर्ण मदत करेल.

कोरोना काळातील कुंभवर काय म्हणाले अमित शाह ? 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, कुंभसाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्वता संतांशी चर्चा केली आहे आणि कुंभ प्रतिकात्मक करण्यास सांगितले आहे. सुमारे 13 पैकी 12 अखाड्यांनी आपल्याकडून कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे, लोकांची संख्या सुद्धा आता कमी होत आहे.