दिल्ली हिंसाचार : दंगल घडविणार्‍या 1100 लोकांची ‘ओळख’ पटली, दोषींना सोडणार नसल्याचं HM अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमित शहा यांनी लोकसभेत दिल्ली हिंसाचारावर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हटले की, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ नंतर कुठलाही हिंसाचार झाला नव्हता. तथापि, अमित शहा बोलत असतानाच विरोधक निषेध करत बाहेर पडले.

अमित शहा म्हणाले की, फेस आयडेंटिटी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही ११०० पेक्षा अधिक लोकांच्या चेहर्‍याची ओळख पटवली आहे. त्यांच्या अटकेसाठी आता ४० टीम तयार करण्यात आल्या असून त्या दिवसरात्र यासाठी कार्यरत राहणार आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, सदनाच्या माध्यमातून मला दिल्ली आणि देशातील जनतेला सांगायचे आहे की, ज्यांनी दंगा करण्याचे धाडस केले आहे, ते लोक कायद्याच्या तावडीतून वाचू शकणार नाहीत. दरम्यान त्यांनी दिल्ली हिंसाचारात ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ३६ तासात हिंसाचार शांत करण्याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक देखील केले.

‘३०० हून अधिक लोक उत्तर प्रदेशातून दिल्लीत हिंसाचार माजवण्याचा आले होते’

अमित शहा यांनी संसदेत सांगितले की गर्दीमुळे पोलिस आणि अग्निशमन दलाची वाहने ईशान्य दिल्लीत पोहचू शकत नव्हती. तसेच हा परिसर उत्तर प्रदेशाच्या सीमेशीही जोडलेला आहे. तसेच ते म्हणाले की, ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार करण्यासाठी यूपीहून ३०० हून अधिक लोक आले होते. तसेच हिंसाचाराच्या रात्री यूपी बॉर्डरला सील करण्यात आले होते.

‘२७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ७०० लोकांवर FIR दाखल करण्यात आली’

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की २४ फेब्रुवारीला ४०, २५ फेब्रुवारीला ५० आणि २६ फेब्रुवारीपासून ८० कंपन्या ईशान्य दिल्लीत तैनात आहेत. त्या कंपन्या अजून तिथेच कार्यरत आहेत. तसेच गृहमंत्र्यांनी सांगितले की हिंसाचारात करोडो लोकांचे नुकसान झाले आहे. २७ फेब्रुवारीपासून तर आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक लोकांवर FIR नोंदवण्यात आली आहे. तसेच ते म्हणाले की, २६४७ लोकांना अटक करण्यात आले असून ओवैसी यांच्या एकाच समुदायाचे ११०० पेक्षा अधिक लोक पकडण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांनी केले वॉकआउट

गृहमंत्र्यांचे बोलणे चालू असतानाच पूर्णपणे उत्तर ऐकून न घेता काँग्रेसी नेते संसदेच्या बाहेर पडले. यानंतर गृहमंत्र्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले आणि अंकित शर्माच्या मृत्यूबाबत ते बोलले.

२५ फेब्रुवारीपासूनच सुरु झाल्या होत्या शांती कमिटीच्या बैठका

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारचा संपूर्ण प्रयत्न असा आहे की कोणत्याही निष्पाप व्यक्तीला शिक्षा होऊ नये. दोन टीम गंभीर गुन्ह्यांचा शोध घेत आहेत. ते म्हणाले की, दिल्ली हिंसाचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्या तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच गृहमंत्री म्हणाले की शांतता समितीची बैठक २५ फेब्रुवारीपासूनच सुरू करण्यात आली होती. तसेच त्यांनी सांगितले की, एक कट रचल्याचा खटलाही नोंदविला गेला आहे, कारण इतक्या कमी वेळात एवढे मोठे नियोजन करता येणार नाही. ते म्हणाले की या दंगलीमागे सखोल कारस्थान आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी या हिंसाचाराला म्हटले मानवतेची हत्या

तत्पूर्वी लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील हिंसाचाराला मानवतेची हत्त्या म्हणून संबोधित केले आणि बुधवारी सांगितले की सरकार हवे असल्यास दंगलींवर वेळीच नियंत्रण ठेवू शकले असते. चौधरी यांनी सभागृहात दिल्लीतील हिंसाचारावर सांगितले की, काही लोकांनी हिंदू जिंकल्याचा दावा केला, तर काहींनी मुस्लिम जिंकल्याचा पण सत्यता म्हणजे मानवतेचा पराभव खऱ्या अर्थाने झाला आहे.