केरळात ‘मुस्लीम लीग’ तर महाराष्ट्रात ‘शिवसेने’बरोबर काँग्रेस पक्ष, अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. मोदी सरकारने ८० च्या विरोधात ३११ मतांनी हे विधेयक मंजूर केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर तीव्र हल्ला चढविला. तसेच कॉंग्रेसने भाजपवर लादलेल्या जातीयवादाच्या आरोपालाही अमित शहा यांनी प्रत्युत्तर देत महाराष्ट्रातील राजकारणावरही व्यंगात्मक टीका केली.

लोकसभेत सोमवारी रात्री उशिरा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला अमित शहा उत्तर देत असताना त्यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढविला. “… कॉंग्रेस हा असा बिन-सांप्रदायिक पक्ष आहे, ज्याची केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत युती आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती आहे. माझ्या आयुष्यात असा बिन-सांप्रदायिक पक्ष मी पाहिलेला नाही. मान्यवर … ” अश्या शब्दात अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

केरळमध्ये मुस्लिम लीग, महाराष्ट्रात शिवसेना !

केरळमधील मुस्लिम लीगबरोबर कॉंग्रेस पक्षाची युती आहे. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसने अलीकडेच शिवसेनेबरोबर युती केली. भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी सोडून कॉंग्रेससोबत जाण्याच्या मुद्यावरून अमित शहा यांनी शिवसेनेवर पहिल्यांदाच निशाणा साधला.

सोमवारी लोकसभेत चर्चेदरम्यान कॉंग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावर धर्माच्या आधारे सतत फूट पाडल्याचा आरोप केला आणि या विधेयकाला विरोध केला. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

सोमवारी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर मोदी सरकारने विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मतांनी मंजुरी मिळवली. महाराष्ट्रातील एनडीएपासून दूर गेलेल्या शिवसेनेनेही लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दर्शविला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like