दिल्लीच्या सत्तेचा मार्ग महाराष्ट्रातून जाणार ; राष्ट्रीय भाषणात शहांचा महाराष्ट्राकडे ओढा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवकाश असताना  भाजपला आपला पक्ष महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकतो यांची अनुभूती झाली आहे. याचा साक्षात्कार अमित शहा यांच्या आजच्या भाषणातून आला आहे. अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्वांची नावे घेतली असून मराठ्यांचा इतिहासाचा हि उल्लेख अमित शहा यांनी केला आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे उदाहरण देत अमित शहा यांनी पानिपतावर मराठे हरले आणि देश २०० वर्षे मागे गेला आता हि तशीच वेळ आली आहे. आपण नेतृत्व नसलेल्या आणि नेता नसलेल्या पक्षाला मतदान केल्यास देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल असे अमित शहा यांनी म्हणले आहे. या देशावर काँग्रेसने ७० वर्षे राज्य केले मात्र या देशाचा विकास त्यामानाने झाला नाही. देशाचा विकास आणि देशाचा गौरव या पाच वर्षात वाढला आहे. पानिपतचा इतिहास सांगून अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराज  या महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्वांची नावे घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या गौरव शाली परंपरेला स्पर्श करून महाराष्ट्राच्या जनतेला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राचे केंद्राच्या राजकारणात महत्व 
महाराष्ट्र हे लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यात जास्त जागा जिंकून आपण भाजपच्या एकूण संख्याबळात वाढ करू शकतो अशी रणनीती भाजचे अध्यक्ष अमित शहा यांनी आखली आहे. त्यामुळे अकार्यक्षम खासदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्षांतर्गत धक्का तंत्राचा वापर करण्याच्या तयारीत भाजप आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेला कोणत्याही परिस्थिती सोबत घ्यायचेच असा निर्धार भाजपने पुन्हा केल्याचे चित्र काल पासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागले आहे. उत्तर प्रदेश मधील ८० जागानंतर महाराष्ट्रातील ४८ जागा या सर्वात जास्तीच्या जागा आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला कडवी झुंज दिली जाण्याचा संभव असल्याने भाजप महाराष्ट्रावर आपले चांगलेच लक्ष केंद्रित करते आहे. या रणनीती संदर्भात अनेक समीकरणे आगामी काळात बघायला मिळणार आहेत.