31 मे नंतर Lockdown वाढणार की नाही ? जाणून घ्या HM अमित शहा आणि मुखमंत्र्यांमध्ये काय झाली चर्चा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सुरू असलेला देशव्यापी लॉकडाऊन तीन वेळा वाढवला आहे. तिसर्‍यांदा वाढवलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 31 मे रोजी संपत आहे. 31 मे नंतर लॉकडाऊन वाढवावा किंवा नाही, याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी देशव्यापी लॉकडाऊन 31 मे नंतर वाढवण्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांचे विचार जाणून घेतले. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू आहे.

गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी टेलीफोनवर चर्चा केली आणि त्यांचे लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार जाणून घेतले. या चर्चेदरम्यान, शाह यांनी राज्यांचे रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनच्या क्षेत्रातील स्थिती जाणून घेतली आणि या क्षेत्रांबाबत मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकले. एक जूननंतर कोणती क्षेत्र खुली करता येऊ शकतात आणि कुठे जास्त प्रतिबंध लावण्याची गरज आहे याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

एका अधिकार्‍याने सांगितले, सध्या मुख्यमंत्र्यांचे मत स्पष्ट झाले नसले तरी बहुतांश मुख्यमंत्री लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या बाजूने आहेत. सोबतच ते आर्थिक व्यवहार वाढवणे आणि जनजीवन सामान्य बनवण्याच्या बाजूने आहेत. आतापर्यंत लॉकडाऊनचा प्रत्येक टप्पा वाढवताना पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. आता प्रथमच अमित शाह यांनी लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या यापूर्वी झालेल्या बैठकांना शाह हजर होते.

या शहरांबाबत होऊ शकतो मोठा निर्णय

लॉकडाऊन आणखी वाढणार की नाही, हे तीन दिवसानंतरच समजणार आहे. परंतु, हे स्पष्ट आहे की, देशातील 11 शहरांबाबत सरकार गंभीर आहे आणि या शहरांबाबत मोठी घोषणा होऊ शकते. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, पुणे, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपुर, सूरत आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.

येथे मिळू शकते सूट, येथे राहील प्रतिबंध

-शाळा उघडणे अवघड दिसत आहे. 15 जूनपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद ठेवल्या जाऊ शकतात. राज्य सरकारने उन्हाळी सुट्टीनंतर शाळा उघडतील असे सांगितलेच आहे.

-रेल्वे आणि घरगुती विमानसेवा सरकारने यापूर्वीच सुरू केली आहे. मेट्रो सर्व्हिससुद्धा 1 जूनपासून पुन्हा सुरू होऊ शकते. अंतरराष्ट्रीय विमानसेवेवर प्रतिबंध सुरूच राहील.

-धार्मिक ठिकाणे उघडली जावीत किंवा नाही, हा निर्णय राज्य सरकारांवर सोडला जाईल. कर्नाटक सरकारने अगोदरच पीएम मोदींना पत्र लिहून 1 जूनपासून धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी केली आहे.

-सलूननंतर मोदी सरकार जिम आणि शॉपिंग मॉल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोडू शकते. कंटेन्मेंट झोनमध्ये ते उघडले जाऊ शकत नाहीत. दिल्लीसह अनेक ठिकाणी सलून उघडले आहेत.