अमित शहा, उद्धव ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

पालघरची लोकसभेची निवडणूक स्वबळावर जिंकल्यानंतर आता शिवसेनेशिवाय लढण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या विधानाला अनुकूल आहेत आणि अशावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होणार आहे. या भेटीतून युतीच्या संदर्भात काही निष्पन्न होईल की ती भेट औपचारिक ठरेल याकडे लक्ष आहे.

अमित शहा यांनी ‘समर्थन आणि संपर्क’ अभियान चालू केले आहे. त्याअंतर्गत त्यांनी मित्रपक्ष आणि भाजपच्या समर्थकांची भेट घेणे सुरु केले आहे. त्याचा भाग म्हणून नुकतीच त्यांनी रामदेव बाबांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत पंजाबमधील अकाली दलाचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट ते घेणार आहेत. महाराष्ट्रात पालघर निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे संबंध अतिशय तणावाचे झाले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर मतं व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. ठाकरे यांचा पवित्रा पाहून दानवे आणि फडणवीस यांनीही स्वबळाची भाषा केली होती.

देशभरातील भाजपच्या मित्र पक्षांपैकी तेलगू देसम पक्ष भाजपपासून दूर गेला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपशी असलेले संबंध तोडले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी लोकसभेच्या २५ जागांची मागणी करून भाजपपुढे पेच निर्माण केला आहे. शिवसेना स्वबळाची भाषा करत आहे. भाजपच्या मित्रपक्षातील हे प्रादेशिक पक्ष भाजपशी फटकून वागायला लागले आहेत त्याचवेळी भाजप विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल, पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल, मायावती यांची बहुजन समाज पार्टी हे पक्ष एकत्रित येण्यासाठी वारंवार बैठका घेत आहेत. भंडारा-गोंदीया लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेसनी एकत्र लढवून यश मिळवले. विरोधकांचा एकत्र येण्याचा प्रयोग भाजपला आव्हान देणारा ठरणार आहे. त्याला उत्तर देण्याकरता अमित शहा यांनी ‘समर्थन आणि संपर्क’ मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात पंकजा मुंडे, अनिल शिरोळे या नेत्यांनी शिवसेनेशी सहकार्य हवे अशी भूमिका घेतली आहे. पण, शिवसेनेनी त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दानवे, फडणवीस यांनी शिवसेनेबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यालाही शिवसेनेकडून काही प्रतिसाद नाही. आता अमित शहा यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची भेट होईल त्यानंतर तरी शिवसेना त्यांची भूमिका लवचिक करेल की स्वबळाची भूमिका कायम ठेवेल हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

भाजपला जुन्या मित्रांची गरज आहेच. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी असे दांडगे पक्ष समोर असताना शिवसेनेने मित्रपक्षाबरोबरच मैत्री कायम ठेवणे गरजेचे आहे. असे मत काही पत्रपंडितांकडून व्यक्त होत आहे. त्याचा काही परिणाम या भेटीदरम्यान होईल का?