भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! अमित शाह यांची ऑनलाइन सभा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भाजपने बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज 72 हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे.

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार आहे. भापजाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात 4 हजार 500 करोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झालेली आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, शाह यांची व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना डिजिटली मार्गदर्शन करण्याचा मार्ग आहे. तर भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी सांगितले की, रविवारी होणारी व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना बुथपर्यंत पोहचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. बिहार भाजापमध्ये संघटनात्म संरचनेत 45 संघटनात्मक जिल्ह्ये, 1 हजार 100 मंडळ, 9 हजार शक्ती केंद्र आणि 72 हजार बुथ यांचा समावेश आहे.