अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – ‘… तर तुमच्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्यावर गेली आहे. तर देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या वर गेली आहे तर मृत्यांची संख्या 1 च्या वर गेली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या या महाभयंकर संकटामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील काही डॉक्टर आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. आता इतर सरकारांनी कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याही मानधनात सरकारनं कपात केली आहे.

कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून लढत असताना त्यांचे वेतनच कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्य आरोग्य सेवकांच्याच (बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात ? खरं तर सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही इतकी मेहनत ते करत आहेत. त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करून नाही. अमित ठाकरे आपल्या पत्रात पुढे लिहतात, आणीबाणीच्या काळात डॉक्टर देवदूत असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे. राज्यातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी अपुरेच आहेत.

शासकीय सेवेतील डॉक्टर निष्ठेनं काम करत आहेत. या डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या मानधनात कपात करणं हे कोणत्याच दृष्टीनं पटणारं नाही. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सेवा आयुक्तालयानं 20 एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच मानधन 55 ते 60 हजार निश्चित केलं आहे. त्याआधी हेच मानधन 87 हजार इतकं मिळत होतं. नव्या आदेशानुसार सुमारे 20 हजार रुपये कपात होणार आहे. यामुळे डॉक्टरांच्या मनात असंतोषाचं वातावरण असून ही मानधन कपात अन्यायकारक असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात कपात होणार नाही याबाबत राज्य सरकारनं काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना पुर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी नाहीतर कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.