कोरोना व्हायरस : मदतीसाठी धावलेल्या अमित ठाकरे यांचे ‘मार्ड’ने मानले आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाविरोधातील लढ्यात काम करणार्‍या डॉक्टरांना पीपीई किट्स आणि इतर अत्यावश्यक वस्तुंची गरज ओळखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 1 हजार किट्स आणि मास्कची मदत डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेला केली. या मदतीबद्दल संघटनेने अमित ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना पीपीई किट्स आणि मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी पुढे येउन डॉक्टरांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1 हजार किट्स आणि मास्कची मदत केली आहे. याबद्दल मार्डने अमित ठाकरे यांचे आभार मानले आहे.

विषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. अमितने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1 हजार पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले. त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले पण, हे डॉक्टर जसे जिवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत, त्याबद्दल माझे कुटुंबीय या डॉक्टरांचे आभार मानू इच्छिते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.