अमूलच्या कार्टूनसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणार्‍याला ‘बिग बीं’चे उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनामुक्तीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ‘अमूल’ने बिग बींसाठी खास कार्टून प्रसिद्ध केले होते. बिग बींनीसुद्धा इन्स्टाग्रामवर ते कार्टून शेअर करत अमूलचे आभार मानले. मात्र या कार्टूनसाठी बिग बींनी पैसे नक्कीच घेतले असणार असा आरोप एका नेटकर्‍याने केला. त्याला बिग बींनी ब्लॉगच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.

‘अमूलने मोफत हे कार्टून बनवले नसेल. काहीतरी रक्कम घेतलीच असेल. दरवर्षी ही रक्कम वाढतच असणार’, असा आरोप एका नेटकर्‍याने केला. त्यावर बिग बींनी लिहिले, ‘तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. जर तुम्हाला सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावे. या कार्टूनसाठी मी कधीच अमूलला विनंती केली नाही आणि करतही नाही. बाण सोडण्याआधी नीट विचार करावा. नाहीतर ते बाण पुन्हा तुमच्यावरच येऊन पडेल. जसे की आता झालंय. माझ्या सभ्य संस्कारांनी त्याचे वर्णन करण्यास थांबवले आहे.’ असे ट्वीट करुन बिग बी यांनी नेटकर्‍याची बोलती बंद केली आहे. 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.