नानावटीवरून टीका करणार्‍या महिलेला ‘बिग बीं’नी दिले उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनावर उपचार घेउन महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी पोस्टमध्ये उपचार घेत असलेल्या नानावटी रुग्णालयातील स्टाफचे आभार मानले आहेत. याच दरम्यान एका महिलेनी अमिताभ बच्चन हे नानावटी रुग्णालयाची जाहिरात करत असल्यामुळे त्यांच्यासाठी असलेला आदर कमी झाल्याचे म्हटले आहे.

नानावटी रुग्णालयात माझ्या वडिलांचा चुकीचा रिपोर्ट देण्यात आला होता. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह दाखवण्यात आली होती. ते 80 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना रुग्णांमध्ये ठेवण्यात आले. नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. पण अमिताभ तुम्ही अशा हॉस्पिटलची जाहिरात करत आहात हे पाहून वाईट वाटले. जे हॉस्पिटल लोकांच्या आयुष्याची पर्वा करत नाही. मला माफ करा, पण आता तुमच्या बद्दलचा आदर राहिला नाही’ या आशयाची पोस्ट करत त्या महिलेनी बिग बींवर टीका केली. तिच्या या पोस्टवर अमिताभ यांनी उत्तर दिले आहे. ‘मला तुझ्या वडिलांचे ऐकून वाईट वाटले. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

लहानपणापासूनच प्रकृतीसंदर्भातील तक्रारींमुळे मी अनेकदा रुग्णालयामध्ये उपचार घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी माझा या निमित्ताने खूप जवळचा संबंध आला आहे. त्यामुळेच या अनुभवामुळे वैद्यकीय क्षेत्रामधील एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे सर्व नर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची योग्य काळजी घेण्याला प्राधान्य देतात’ असे अमिताभ यांनी म्हटले आहे. ‘मी हॉस्पिटलची जाहिरात करत नाही. नानावटीमध्ये उपचारादरम्यान मला मदत केलेल्या लोकांचे मी फक्त आभार मानत आहे. तुमचा माझ्या बद्दलचा आदर कमी झाला असेल. पण माझा माझ्या देशातील डॉक्टरांबद्दलचा आदर कमी होणार नाही’ असे बिग बींनी म्हटले आहे.