‘बिग बी’ अमिताभच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार ! आता ऐकू येणार ‘ही’ धून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकाने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी सुरु केलेली ‘नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं’ ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ट्युनचा आवाज आता कानी पडणार नाही. कारण ही कॉलर ट्यून बंद आता बंद केली जाणार आहे. शुक्रवारपासून ( दि. 15 जानेवारी) कोरोना कॉलर ट्यून हटवून त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून लावण्यात येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाला शनिवार (दि. 16) पासून सुरुवात होणार आहे. या विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

नवा ट्युनसाठी संदेश तयार करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरु आहे. स्वास्थ मंत्रालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दरम्यान, सोमवारी या संदर्भातील बैठक पार पडली आहे. या नव्या कॉलर ट्यूनला अमिताभ बच्चन यांचा आवाज असणार की आणखी कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कॉलर ट्यून देखील अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवावी, यासाठी ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर करावी, अशी सगळ्यांच्या वतीने विनंती असे या याचिकेत म्हटले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांचाही कॉलर ट्यूनवर आक्षेप
‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली होती. ‘कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती दिली जात आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही’, असे नांदगावकर यांनी म्हटले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेली कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी केली होती.