‘त्या’ प्रकरणातील अमोल काळेची पोलीस महासंचालकांकडून चौकशी

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – राज्याच्या एसआयटी विभागाचे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेतली. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. अलंकार हॉल येथे संशयित अमोल काळेचीही त्यांनी चौकशी केल्याचे समजते. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमोल काळे यास कोल्हापूर एसआयटीने कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. काळे याच्याकडे सुरू असणाऱ्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती एसआयटीच्या हाती मिळत आहे. त्यामुळे तपासाला गती मिळाली आहे. हा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्याने तपासातील घडामोडी गोपनीय ठेवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांना तर तपास यंत्रणेपासून दूर ठेवले जात आहे. या तपासाचा आढावा घेऊन सूचना देण्यासाठी एसआयटीचे महासंचालक संजीवकुमार सिंघल कोल्हापुरात आले होते. तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आयजी नांगरे-पाटील, अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहावर गेले. विश्रांतीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी पानसरे हत्या प्रकरणातील पाचवा संशयित अमोल काळे याच्याकडेही चौकशी केल्याचे समजते. अलंकार हॉल परिसरात यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हॉलकडे येणाऱ्या लोकांना गेटजवळच थांबवले जात होते. संशयित अमोल काळेचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनीही अलंकार हॉल येथे येऊन अमोलची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमोलकडे त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.

गुन्हेगाराच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यु