‘मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही’ खा. उदयनराजेंच्या भेटीनंतर खा.अमोल कोल्हेंचं ‘सूचक’ वक्‍तव्य

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असून त्या पार्श्वभूमिवर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची आज भेट घेतली. सातारा येथील सर्कीट हाऊसवर झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे.

उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. सोलापुरातील भाजपच्या मेगा भरतीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोललं जात होतं. मात्र त्यांचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे यांनी भाजपात जाऊ नये यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांनी केला.

बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना, आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. उदयनराजे भाजपात जाणार का ? यावर बोलताना ते म्हणाले की, ते छत्रपती आहेत. एक मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही. ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. ते जर भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा असतील असे कोल्हे यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –