शिवाजीराव आढळराव शेवटपर्यंत ‘डेंजर झोन’ मध्येच ; शिरूरमधून अमोल कोल्हे विजयी ; जाणून घ्या किती मतांनी विजयी झाले

शिरूर (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ६३,००२ मतांनी विजयी झाले आहेत. शिरूर मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांना ५,५३,४०६ मते मिळाली तर आढळराव पाटील यांना ४,९०,४०४ एवढी मते पडली. मतमोजणीत सुरुवातीपासूनच शिवाजीराव आढळराव पाटील डेंजर झोनमध्ये राहिले. पहिल्या दोन फेऱ्यांनंतरच अमोल कोल्हे यांनी १५ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली होती.

शिरूर लोकसभा मतदार संघात एकूण २१ लाख ७३ हजार ४८४ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण १२ लाख ९० हजार ५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ५९. ३८% टक्के मतदान झाले होते.

शिवसेनाने गेल्या तीन निवडणुकीत शिवाजी आढळरावांच्या नेतृत्वाखाली शिरूर मतदार संघात हॅट्रिक साधली होती. त्यामुळे निवडणुकीत आढळराव विजयाचा चौकार मारणार की आऊट होणार याकडे शिरूरकरांचे लक्ष लागून होते. आढळराव पाटील यांची ही सीट निवडणूक जाहीर होईपर्यंत सेफ सीट मानली जात होती.

मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि मालिकांमधून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणारे आणि महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने अचानक उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. ही निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे जास्त गाजली. प्रचारापासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेत आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं.

शिरूर हा मतदार संघ पुणे जिल्ह्यात असून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमेवर हा मतदार संघ आहे. यात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदारसंघाचे राजकारण काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरत होते. मात्र २००४ साली शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपात शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव केला. मागील निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख एक हजार ७५८ मतांनी पराभव केला होता.

शिरूर मतदार संघ

एकूण मतदार – २१ , ७३ ,४८४

एकूण मतदान – ५९. ३८%

विजयी उमेदवार – अमोल कोल्हे

मिळालेली मते – ५,५३,४०६