सरकारवर टीका केल्याने भर कार्यक्रमात अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण रोखलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एनजीएमएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. इतकंच नाही तर भाषण लवकर संपवण्यासही सांगितले. अमोल पालेकर यांचा अर्धवट भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


अमोल पालेकर नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल पालेकर यांनी भाषणात म्हटलं की, आर्ट गॅलरीने कसं आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे. त्यावेळी अमोल पालेकरांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले.

भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यात सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. केंद्र सरकारवर या कार्यक्रमात टीका करू नका, असे पालेकर यांना बजावले. अखेर अमोल पालेकरांनी थेट त्यांना विचारणा केली की, मी भाषण मधेच संपवावं, असं तुम्हाला वाटतं का? त्यावेळी समन्वयकांनी प्रभाकर बर्वे यांच्याविषयी बोलावं आणि भाषण लवकर संपवावं असं सांगितलं.भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकर चांगलेच संतापले. पालेकरांना बऱ्याचदा रोखल्याने अखेर त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले.