पुणे पदवीधरमध्ये नीता ढमाले दोन्ही पक्षांच्या प्रचारामध्ये केंद्रस्थानी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलल्यामुळे स्वतंत्रपणे अपक्षरित्या निवडणूक लढवणाऱ्या नीता ढमाले या भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रचारामध्ये केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांचा धसका घेतला असून मतविभागणी टाळण्यासाठी दोघांनाही आपल्या प्रचारसभांमधून मतदारांना आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आवाहन करावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नीता ढमाले यांनी आपल्या प्रचारदौऱ्यात मतदारसंघातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला सहकार्य करण्याबाबत त्यांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील काही आमदार उघडपणे नीता ढमाले यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याने दोन्हीकडची प्रमुख नेतेमंडळी प्रचारसभांमधून आपली चिंता व्यक्त करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना उमेदवारी दिल्याने पदवीधरसाठी तयारी करणारे इतर जिल्ह्यातील अनेक नेतेही नाराज आहेत. याच नाराजीचा सूर मतदारांमध्येही आहे. एकंदर कारखानदार असणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी पक्षांसाठीच अडचणीची ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नीता ढमाले यांनी वर्षभरापासून मतदारसंघात केलेले काम आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून केलेल्या ‘कारखानदार नको, पदवीधर हवा’ या आवाहनाला मतदारांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. पदवीधरांच्या निवडणुकीत आजपर्यंत ज्यांना निवडून दिले ते त्यांच्या पक्षात प्रस्थापित झाले, त्यांना चांगली पदे मिळाली; परंतु पदवीधरांचे प्रश्न त्यांना सोडवता आले नसल्याने यावेळी कारखानदारांऐवजी पदवीधरांच्या योग्य प्रतिनिधीलाच आपले मत देण्यार असल्याच्या प्रतिक्रिया मतदारांमधून येत आहेत.