Coronavirus : ‘कोरोना’चा धूम्रपान करणार्‍यांच्या मेंदूलाही फटका बसू शकतो

पोलिसनामा ऑनलाईन – सातत्याने धूम्रपान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा मेंदूला असलेला धोका वाढतो असे जोधपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) म्हटले आहे. या संस्थेच्या वैज्ञानिकांनी घातक कोरोना विषाणू चेतासंस्थेला कितपत घातक ठरतो याचे संशोधन केले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये अनेकदा वास व चव संवेदना गमावली जाण्याची शक्यता असते. त्यांनी लगेच स्वत:ला विलगीकरणात ठेवणे गरजेचे असून डॉक्टरांना भेटणेही महत्त्वाचे आहे, असा इशारा या संशोधनात देण्यात आला आहे.

‘न्यूरोलॉजिकल इनसाइट्स ऑफ कोविड 19’ या अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, ज्यांना कोरोनाचा संसर्ग होतो त्यांच्या केंद्रीय चेतासंस्थेलाही धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे त्यांच्या वास व चव या संवेदना कमी होतात.

जोधपूर आयआयटीचे प्राध्यापक सुरजित घोष यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू हा मानवी शरीरातील ‘ह्यूमन अँजियोटेन्सिन कनव्हर्टिग एनझाइम 2’ या संग्राहकाशी क्रिया करतो . त्यानंतर तेथूनच तो विषाणू प्रवेश करतो. नाकातील श्लेष्मल द्रव, मानवी शरीराचे सर्व अवयव यात विषाणू पसरू शकतो. मेंदूतही वर उल्लेख केलेल्या संग्राहकाच्या माध्यमातून हानी होते. धूम्रपानामुळे कोरोनाचा संसर्ग मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता अधिक असते कारण मानवी संग्राहक व निकोटिन संग्राहक यांच्यात वेगवेगळ्या आंतरक्रिया होऊन गुंतागुंत वाढते. दोन्ही संग्राहक एकदम क्रियाशील झाल्याने जेव्हा व्यक्ती धूम्रपान करते, तेव्हा एचएसीइ 2 चा प्रभाव वाढतो कारण त्याला निकोटिनमुळे प्रेरणा मिळते. कोविड 19 रुग्णांचे शवविच्छेदन करताना धूम्रपान करणारा व न करणारा अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा धूम्रपान करणार्‍या व्यक्तींवर काय परिणाम होतो याचा उलगडा होणार आहे.