‘अम्फन’ चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमध्ये हाहाकार ! आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू, CM ममता यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2.5 लाखांच्या मदतीची घोषणा

नवी दिल्ली : चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मी असे संकट यापूर्वी कधीही पाहिले नाही. मी पंतप्रधानांना राज्याचा दौरा करून आढावा घेण्याची विनंती करते. बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना प्रत्येकी  2.5 लाख  रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली.

https://twitter.com/ANI/status/1263415822363488257

पश्चिम बंगालमध्ये अम्फानने मोठा विध्वंस केला आहे. याबाबत ममता बनर्जी यांनी म्हटले आहे की, असे वादळ 283 वर्षांपूर्वी 1737 मध्ये आले होते. वादळामुळे अनेक परिसर उध्वस्त झाले आहेत, दळवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. दक्षिण आणि उत्तर 24 भाग जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. कोलकातामध्ये सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन अलर्टवर आहे आणि स्थितीवर लक्ष ठेऊन आहे. पश्चिम बंगालच्या सीएम म्हणाल्या, वादळात सुमारे एक लाख करोड रूपयांचे नुकसान झाले आहे.

अम्फान वादळ पश्चिम बंगालच्या खाडीत दुपारी सुमारे 3.30 ते 5.30 वाजताच्या दरम्यान लँडफॉल सुरू झाले. बंगालच्या दिघा परिसरात आणि बांग्लादेशच्या हटिया द्वीपच्यामध्ये दुपारी 3 वाजता वादळाने सुरूवात केली, त्यांनतर अनेक तास विध्वंस सुरू होता. ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये या वादळाने मोठा प्रकोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये रस्त्यांवर पाणी भरले आहे आणि झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. हजारो घरे उध्वस्त झाली आहेत. कच्ची घरे पूर्णपणे कोसळली आहेत. तर पक्क्या घरांची छप्पर उडून गेली आहेत.

ओडिशाच्या केंद्रपाडा, बालासोर, भद्रकमध्ये वादळाने मोठा विनाश केला आहे. येथे वेगवान वार्‍यामुळे झाडे आणि वीजेचे खांब पडले आहेत. राज्य प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकांनी मदतकार्याला सुरूवात केली आहे. लाखो लोकांना प्रभावित परिसरातून काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले होते.