5 हजाराची लाच घेताना अमरावती जिल्हयातील पं.स.च्या विस्तार अधिकार्‍यास अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कसुरी अहवाल न पाठविण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. सदाशिव सावजी सपकाळ (वय 56) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सदाशिव सपकाळ हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार हे देखील शासकीय नोकरदार आहेत. दरम्यान तक्रारदार यांच्या ग्रामपंचायतीचा मासिक सभा, ग्राम सभा, शिल्लकेचा तपशील सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना याबाबतचा कसुरी अहवाल न पाठविण्यासाठी तक्रारदार यांना 5 हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी अमरावती एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सपकाळ यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. अमरावती परिक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, बुलढाणा विभागाचे उपअधीक्षक आर. एन. मळघणे व त्यांच्या पथकाने ही सापळा कारवाई केली आहे.