खासदार नवनीत राणा यांना हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’, आगामी 20 दिवस राहणार क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून रविवारी रात्री (१६ ऑगस्ट) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी रात्री (१५ ऑगस्ट) लीलावतीतून डिस्चार्ज दिला आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्यासह कुटूंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांचे दोन लहान मुले आणि सासू- सासऱ्यांच्या देखील समावेश आहे.

नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावरती सुरुवातीला उपचार सुरु होते. पण नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने त्यांना वोकहार्ट रुग्णालयाच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी आयसीयूतून बाहेर आल्यावर समाजमाध्यमात एक व्हिडीओ शेअर केला होतो. त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या सर्व हितचिंतकांना प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते.

नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, “लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आलं असून, माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांना सुद्धा मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी अजून चांगली काम करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” असल्याचं त्यांनी सांगितलं होत.

दरम्यान, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या होत्या. तर त्यांचे पती युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारकीपदी निवडून आलेले. त्यांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.