Amravati News : 4 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, आजी निघाली सूत्रधार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती शहरामध्ये एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना बुधवारी (दि.17) घडली होती. ही घटना शहरातील शारदा नगरमध्ये घडली. नयन मुकेश लुनीया (वय-4) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. नयन याचे रात्री आठच्या सुमारास अपहरण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळून गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात नयन याची आजीच अपहरणकर्ती निघाली. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली. सावत्र आजीने खंडणीसाठी आपल्या नातवाची सुपारी देऊन अपहरण करायला लावले, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला.

नयन हा त्याची आजी मोनिका जसवतराय लुनीया (वय-47) हिच्यासोबत घराशेजारी खेळत असताना 17 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास त्याचे अपहरण झाले. अपहरणाचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. संशयाची सुई आजीकडे गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे करुन अहमदनगर येथून नयन या मुलाची सुटका केली.

याप्रकरणी पोलिसांनी आजीची मैत्रीण हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, अल्मश ताहीर शेख (रा. कोठला अहमदनगर), मुजाहिद शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) या सर्वांना अहमदनगर शहरांतून वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अपहरण केलेला नयन हा आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. या माहितीवरून अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना आणि अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी नयन याची आजी मोनिका जसवतराय लुनीया हिनेच शाकीर शेख हिला सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. मोनिका लुनीया हिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने आपल्या नातवाचे अपहरण करुन खंडणी वसूल करुन माहेरी पैसे देण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक करुन बालकाची सुटका केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली. नयन याचे अपहरण करण्याचा प्लॅन अधिच ठरला होता. यासाठी आरोपी सात दिवसांपासून अमरावती शहरात आले होते. पोलिसांनी अहमदनगर येथून पाच तर अमरावती येथून मोनिका लुनीया यांना अटक केली.