Amravati Corona Guidelines : …तर वधू-वर पक्षावरही दाखल होणार फौजदारी गुन्हा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर कोरोनासंदर्भातील अनेक नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता चित्र भयावह होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद अमरावतीमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी (दि.17) दिवसभरात तब्बल 498 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा वेग धरल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा अनेक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास याची शिक्षा म्हणून वाहतुकदाराला पाच हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येणार आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांना 10 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याची नोंद देखील करण्यात येणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ यापुढे रात्री 10 पर्यंत मर्यादित असणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट सारख्या अस्थापनांवर 50 टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळून आल्यास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावून संबंधित अस्थापना 10 दिवस सील करण्यात येणार आहे.

कोरोना काळात विवाह इच्छुकांचे विवाह रद्द करण्यात आले. मात्र, आता नियमांमध्ये शिथिलता येताच पुन्हा एकदा या समारंभांना वेग आला आहे. मात्र, समारंभामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. यामुळे अमरावतीमध्ये याबाबतही सक्तीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्या अंतर्गत लग्नसोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास हॉल चालकाला 50 हजार दंड आणि 10 दिवस हॉलला सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वधू-वर पक्षावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते.