अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडावे, शिवसेनेच्या मंत्र्यांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत अशी कुठली गोष्ट घडली ज्यामुळे अमृता फडणवीसांनी असुरक्षित वाटू लागलंय. त्यांना इतकंच जर असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी राज्य सोडावं. त्यावर हाच एक उपाय आहे, असे म्हणत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सणसणीत टोला लगावला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या व त्यानंतरच्या चौकशीचा संबंध अमृता फडणवीस यांनी थेट मुंबईतील सुरक्षितेतशी जोडला होता.

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने केला जात आहे, हे पाहता मुंबईनं माणुसकी गमावल्यासारखं वाटतंय. निष्पाप व स्वाभिमानाने जगणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नसल्याचं अमृता फडणवीस यांनी सोमवारी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांनी एका प्रकारे पोलिसांवर संशय व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमृता फडणवीस टीकेच्या रडारवर आल्या आहेत.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. मागे 5 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील होते. त्यामुळे सरकार बदलले म्हणजे पोलीस बदलले असं होत नाही. ज्या पोलिसांची पाच वर्षे सुरक्षा घेतली त्या पोलिसांवरच जर संशय घेत असाल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडून जावं, असा सणसणीत टोला परब यांनी लगावला आहे.

गेली 5 वर्षे पोलिसांची सुरक्षा घ्यायची आणि त्यांच्यावर टीका करायची असेल तर त्यांनी राज्य सोडून जाणे हाच योग्य पर्याय आहे. मुंबईत असं काय घडलं ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे ? आजही अमृता फडणवीस पोलिसांचीच सुरक्षा घेऊन फिरत आहेत, अशी आठवणही परब यांनी करु दिली. तसेच बिहार पोलिसांकडून हस्तक्षेप केला जात आहे, हे बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी राजकारण आहे, खुर्ची मिळवण्यासाठी तडफड दिसून येत आहे, असा टोला परब यांनी भाजपला लगावला. मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत याचं प्रकरण व्यवस्थित हाताळत आहेत, असेही परब यांनी स्पष्ट केलं.