कुटूंबातील 5 जणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी DSP आणि माजी DIG सह 6 दोषी

अमृतसर : वृत्तसंस्था – येथील न्यायालयाने एका कुटुंबातील पाच लोकांच्या सामुहिक आत्महत्येच्या प्रकरणात सहा लोकांना दोषी ठरवले. 30 ऑक्टोबर 2004 ला चौक मोनी येथे राहणार्‍या हरदीप सिंह नावाच्या व्यक्तीने आई, पत्नी, मुलगा व मुलीसोबत सामुहिक आत्महत्या केली होती. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांमध्ये माजी डीआयजी कुलतार सिंह, विद्यमान गाईंदवाल साहिबचे डीएसपी व तत्कालीन एसएचओ हरदेव सिंह बोपाराय यांचा सहभाग आहे. न्यायालयाने हा निर्णय आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ब्लॅकमेलिंगच्या आधारावर सुनावला आहे.

दोषींमध्ये हरदीप यांचा चुलता महिंदर सिंह, त्यांची सून सबरीन कौर, मुलगी परमिंदर कौर आणि जावई पलविंदर पाल सिंह यांचाही समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश संदीप बाजवा यांचे न्यायालय सर्व दोषींना 19 फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार आहे.

चौक मोनीमध्ये राहणारे हरदीप सिंह यांचा आपले वडील सुंदर सिंह यांच्या सोबत वाद सुरू होता. 11 ऑगस्ट 2004 ला भांडणात हरदीप यांच्या हातून वडीलांचा मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूनंतर हरदीप मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना चुलता महिंदर सिंह यांची सून सबरीन कौरने पाहिले. यानंतर महिंदर सिंह, सबरीन कौर, परमिंदर कौर आणि तिचा पती पलविंदर पाल सिंह यांनी पोलिसांना सांगून पकडण्याची धकमी देऊन हरदीप यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली होती.

आरोपींनी धमकावून हरदीपकडून सात लाख रूपये घेतले होते. यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी हरदीपच्या एका मित्राने त्याची भेट तत्कालिन एसएसपी कुलतार सिंह यांच्याशी करून दिली. कुलतार सिंहने हरदीपच्या विरोधात तकलादू केस दाखल करण्यासाठी पाच लाख रूपये घेतले. नंतर सात लाख रुपयांची आणखी मागणी केली. कुलतारने हरदीपच्या पत्नीसोबत आपल्या कार्यालयात वाईट कृत्यदेखील केले होते. हरदीपला ब्लॅकमेल करून तो त्याच्या पत्नीला चंदीगडमधील एका गेस्ट हाऊसवर देखील घेऊन गेला होता. कुलतार आता डीआयजी पदावरून रिटायर्ड झाला आहे.

अखेर पोलीस आणि नातेवाईकांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून हरदीप सिंहने 30 ऑक्टोबर 2004 च्या रात्री आई जसवंत कौर, पत्नी रोमी, मुलगा इमरत (6) आणि मुलगी सनमीत (9) यांच्यासह घरात आत्महत्या केली होती. हरदीपने आत्महत्येपूर्वी घराच्या भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आरोपींची नावे लिहिली होती. सी डिव्हिजन पोलीस ठाण्याचे तत्कालीन इन्स्पेक्टर हरदेव सिंह जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी कुलतार यांच्या आदेशानंतर भिंतीवर लिहिलेली सुसाइड नोट खोडण्यास सुरूवात केली, परंतु त्याचवेळी घटनास्थळी पत्रकार पोहचल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता.