सेल्फीसाठी ती जागा सुरक्षित होती : अमृता फडणवीस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आंग्रीया या क्रूझच्या मुंबई-गोवा फेरीच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान धोकादायक ठिकाणी जाऊन पोलिसांसमक्ष सेल्फी काढल्याने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर चौफेर टीका सुरू आहे. यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत आंग्रीया क्रूझचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते गोवा या जलमार्गावर ही क्रूझसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. अमृता फडणवीस या क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन बसल्या होत्या. उपस्थित पोलिसांनी अमृता फडणवीस यांनी मागे यायला सांगितले होते. मात्र, अमृता फडणवीस यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. डेकवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लावलेले रेलिंग ओलांडून त्या बसल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे सेल्फीप्रेमावर सर्वत्र टीका होत होती.

अमृता फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, मी एका क्रूझवर होते. ती जागा धोकादायक नव्हती. मी ज्या पायरीवर बसले होते त्याच्या खाली आणखी एक बाल्कनी होती. मी शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी तिथे बसले होते. तिथे गेल्यावर मी एखादा सेल्फी काढला. पण ती जागा सुरक्षितच होती, असा दावा त्यांनी केला.

उपस्थित अधिकारी मला उद्घाटन सोहळ्याला येण्याची विनंती करत होते. मात्र, मी शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी तिथेच थांबले, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने अमृता फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावरही अमृता यांनी भाष्य केले. जर यामुळे कुणाचे भले होत असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी. मी कोणासमोरही यासाठी माफी मागू शकते, असे म्हणत अमृता यांनी सेल्फी घेऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले.