देवेंद्र फडणवीस नेहमी खरं बोलतात : अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प नक्की काय असतो हे कळावे म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहिले आहे. विधानभवनात त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या पगारापेक्षा माझी पत्नी अमृता हिचा पगार जास्त आहे, असे एक विधान केले होते. त्या विधानाला अमृता फडणवीसांनी दुजोरा दिला असून, देवेंद्र यांनी केलेले वक्तव्य खरे आहे कारण, देवेंद्र नेहमी खरेच बोलतात. असे अमृता म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात नेत्यांचे राजकीय फटकारे श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. फडणवीसांनी पुस्तक लिहिण्यामागचा आपला उद्देश स्पष्ट केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना फडणवीसांनी उत्पन्न व खर्चा बाबत स्पष्टीकारण देताना त्यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पगाराचे उदाहरण दिले. माझ्यापेक्षा अमृताचा पगार जास्त असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले.

फडणवीस यांच्या वक्तव्यावर आता पत्नी अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली की, देवेंद्र यांनी जे वक्तव्य केलं, ते अगदी खरं असून, देवेंद्र हे नेहमीच खरे बोलतात आणि त्यांना बोलावेच लागते. माझा पगार आता त्यांच्यापेक्षा जास्त आहे, याबद्दल त्यांना कधीच वाईट वाटत नाही. देवेंद्र यांना माझा अभिमान वाटतो. या गोष्टींचा मला फार आनंद होतो असे अमृता फडणवीसांनी मुलाखती दरम्यान सांगितले.