इंदोरीकर महाराजांना दिला अमृता फडणवीसांनी ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केलं आहे. ‘इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे काही व्हिडिओ मी पाहिले आहेत. ज्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात. त्यांच्या मतांचा लोकांच्या मनावर प्रभाव पडतो. याच भान त्यांनी ठेवायला हवं. त्यामुळे त्यांनी अशी विधान करू नये जेणेकरून महिलांचा आदर कमी होईल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

या मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. त्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर ठाम असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड काम केलं आहे. अशा व्यक्तिला महिलांची माफी मागायला लावण्याची आदित्य यांची कृती मनाला पटणारी नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अमृता यांनी स्तुतिसुमनेही उधळली. ‘रश्मी ठाकरे या अनेकांच्या आदर्श आहेत. त्या इन्सापायरिंग वुमन आणि फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र आहेत. रश्मी ठाकरे आणि माझं बॉडिंग चांगलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल. मी ‘मातोश्री’वर गेले असता त्यांनी माझा पाहुणचार केला होता. त्या जेव्हा वर्षा बंगल्यावर आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात महिला मुख्यमंत्री होण्याचं पोटेन्शियल असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.