‘संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार ?’ अमृता फडणवीस अन् प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटरवरून रंगला ‘सामना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्री असताना मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत 2017 मध्ये करार करण्यात आला होता. मात्र, आता मुंबई पोलिसांचे पगार एचडीएफसी (HDFC Bank) बँकेतून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस (Axis Bank) बँकेतून करण्याबाबतचा करार 31 जुलै 2020 रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलिसांचा पगार एचडीएफसी बँकेतून करण्याचा निर्णय घेतला. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) आणि शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्य म्हटले आहे की, संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार ? असं म्हणत त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना टोला लगावला आहे. एका गोष्टीचा मला पुनरूच्चार करायचा आहे, अ‍ॅक्सिस बँकेच्या सरकारी विभागाकडून (आधीची UTI बँक) पोलीस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय केवळ बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर होते. 29 ऑक्टोबर 2005 रोजी यासंबंधी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

रातोरात कर्मचाऱ्यांची पगाराची खाती हलवण्यात आली

अमृता फडणवीस यांच्या ट्विटला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मुंबई पोलीस लवकरच अ‍ॅक्सिस बँकेतून 50 हजार पोलिसांची पगार खाती हस्तांतरीत करतील. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती. हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अ‍ॅक्सिस बँक माझी घरगुती बँक नाही

अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्षे काम केले आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील ? ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. एचडीएफसी बँकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गृह विभागाने हा निर्णय घेतला असून अॅक्सिस बँकेतून होणाऱ्या पगारी वर्ग केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांना कोणत्या सुविधा मिळणार

नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास दहा लाखांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास एक कोटीपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन आपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना एचडीएफसी बँक देणार आहे.